ICC World Cup 2019 | विराटचा विश्वचषकाच्या बाद फेरीत फ्लॉप शो...

विराटचं विश्वचषकाच्या बाद फेरीतलं अपयश यंदाही कायम राहिलं. मॅन्चेस्टरमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात विराट अवघ्या एका धावेवर माघारी परतला. त्यामुळे टीम इंडियाचं विश्वचषकातलं आव्हानही संपुष्टात आलं.

मॅन्चेस्टर : मॅन्चेस्टरच्या महायुद्धात कर्णधार विराट कोहलीने भारतीय क्रिकेटरसिकांचा घोर अपेक्षाभंग केला. न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात विराट अवघ्या एका धावेवर माघारी परतला. त्यामुळे लागोपाठ तिसऱ्या विश्वचषकात विराट कोहली बाद फेरीच्या सामन्यात आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी बजावत नसल्याचं दिसून आलं.

2011 साली विराट कारकीर्दीतल्या पहिल्या विश्वचषक स्पर्धेत खेळला होता. तो विश्वचषक भारताने जिंकला असला तरी विराटला त्या विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व, उपांत्य आणि अंतिम सामन्यात मिळून 68 धावाच करता आल्या होत्या.

2015 साली ऑस्ट्रेलियातल्या विश्वचषक स्पर्धेत भारताचं आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आलं होतं. या विश्वचषकाच्या बाद फेरीत विराटला दोन सामन्यात अवघ्या चार धावाच करता आल्या.

विराटचं विश्वचषकाच्या बाद फेरीतलं हे अपयश यंदाही कायम राहिलं. मॅन्चेस्टरमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात विराट अवघ्या एका धावेवर माघारी परतला. त्यामुळे टीम इंडियाचं विश्वचषकातलं आव्हानही संपुष्टात आलं.

पाहूयात लागोपाठ तीन विश्वचषकातल्या बाद फेरीच्या सामन्यांमध्ये विराट कोहलीची कामगिरी कशी आहे?

विश्वचषक 2011 उपांत्यपूर्व फेरी - 24 धावा, 33 चेंडू

विश्वचषक 2011 उपांत्य फेरी - 9 धावा, 21 चेंडू

विश्वचषक 2011 अंतिम फेरी - 35 धावा, 49 चेंडू

विश्वचषक 2015 उपांत्यपूर्व फेरी - 3 धावा, 8 चेंडू

विश्वचषक 2015 उपांत्य फेरी - 1 धाव, 13 चेंडू

विश्वचषक 2019 उपांत्य फेरी - 1 धाव, 6 चेंडू

एकूण सामने - 6

धावा - 73

सरासरी - 12.16

भारताचं आव्हान संपुष्टात

विराट कोहलीच्या टीम इंडियाचं इंग्लंडमधल्या विश्वचषकातलं आव्हान अखेर उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. न्यूझीलंडने या सामन्यात टीम इंडियाचा 18 धावांनी पराभव केला. या सामन्यात न्यूझीलंडनं भारताला विजयासाठी 240 धावांचं आव्हान दिलं होतं. पण त्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला सर्व बाद 221 धावांचीच मजल मारता आली. रवींद्र जाडेजा आणि महेंद्रसिंग धोनीनं सातव्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी रचून भारताच्या विजयासाठी शिकस्त केली. पण मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात जाडेजा माघारी परतला आणि टीम इंडियाच्या विजयाची आशा मावळली. जाडेजाने 59 चेंडूंत चार चौकार आणि चार षटकारांसह 77 धावांची खेळी उभारली. धोनीने 72 चेंडूंत एक चौकार आणि एक षटकारासह 50 धावांची खेळी केली.

संबंधित बातम्या

Ind vs NZ | पहिल्या दहा षटकात सर्वात कमी धावांचा विक्रम भारताच्या नावे

World Cup 2019 : सेमीफायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडकडून 18 धावांनी पराभव